प्रास्ताविक - पंचायत पंचांग

ग्रामपंचायतींना प्रत्येक महिन्यात विविध कामे पार पाडावी लागतात.  ग्रामपंचायतींना प्रभावीपणे काम  करता यावे म्हणून  ग्रामपंचायतीतील विविध कामांची सूची तयार करुन वार्षिक पंचाग - प्रत्येक महिन्यातील कामांची मासिक सूची 2000 ते 2005 या कालावधीत तयार करण्यात आली.  ही सूची यशदातील पर्यावरण आणि विकास केंद्राचे अनेक प्रशिक्षण कार्यक्रमामधील अधिकारी लोकप्रतिनिधींकडून तसेच श्री मल्लिनाथ कलशेट्टी, भाप्रसे (तत्कालीन- 2005) राज्य समन्वयक, संवाद क्षमता विकास कक्ष, पाणी पूरवठा स्वच्छता विभाग यांनी गावपातळीवरील पदाधिकारी, अधिकारी शासनातील अधिकारी यांच्या सहकार्याने हे वार्षिक पंचांग तयार केले आहे.

ग्रामीण पर्यावरण नियोजन ग्रामपंचायतींचे वर्षभरातील कामे सुलभरित्या पार पाडण्यासाठी सरपंच, ग्रामविकास अधिकारी कार्यकारणीतील सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांना सहभागी करुन कामे करणे गरजेचे आहे.  प्रत्येक महिन्यातील काम हे ठराविक पध्दतीने किंवा नियमांचे पालन करुन केल्यास ते काम अधिक सोपे होईल.  यासाठी जर प्रत्येक महिन्यातील कामाचा घोषवारा  करावयाची कामे यांची एक सूची तयार करुन होणारे काम हे सूची प्रमाणे आहे किंवा नाही हे पडताळून पाहिले तर वर्षभरातील सर्व कामे ही व्यवस्थित पार पाडल्या जातील. यासाठी गावातील ग्रामस्थांना सहभागी करुन घेणे गरजेचे आहे.  त्याच प्रमाणे गावातील सक्षम महिलांना या कामाची जबाबदारी सोपविल्यास किंवा बचत गटातील सदस्याना वरीलप्रमाणे कामे सोपविल्यास ते जबाबदारी पार पाडू शकतील यात काहीच शंका नाही. 

73व्या घटना दुरुस्तीमुळे पंचायत राज व्यवस्थेस घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे. आता वर्षात किमान सहा ग्रामसभा  घेणे बंधनकारक आहे.  या माध्यमामध्ये ग्रामसभेपुढील विषय सूची दिलेली आहे.  तसेच राज्य शासनाच्या पाणी पुरवठा स्वच्छता विभागातील योजनांची यादी, पाणी गुणवत्ता सनियंत्रण, हागणदारी मुक्त गाव, ग्रामीण पर्यावरण नियोजनाद्वारे शाश्वत ग्रामीण विकास यांत ग्रामपंचायतींची भूमिका इ. माहिती या माध्यमामध्ये दिलेली आहे.  यशदा अनेक शासकीय विभागांनी, जिल्हा परिषदेने विविध योजनांची माहिती असलेले पुस्तक काढलेले आहे. त्याचाही अभ्यास करुन गावात अनेक योजना राबविण्याचा प्रयत्न व्हावा.


सदरहू माहितीतून ग्रामपंचायतींची वर्षभरातील कामे पर्यावरण नियोजन निश्चित करण्यास फार मदत होणार आहे. त्यासाठी सदरहू माहिती संकलित करुन पडताळणी करण्याच्या कामास प्रोत्साहन दिलेल्या सर्व मान्यवरांना निश्चितच श्रेय दयावे लागेल. 

डॉ. भारत भूषण, प्राध्यापक, पर्यावरण नियोजन, यशदा, पुणे.